|| सुस्वागतम ||



ज्योतिष उपासना अवलोकन अनुभूती या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे.


ज्योतिषशास्त्र हे वेदाचे एक अंग आहे. दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात . या निर्णयासाठी अनुकूल किवा प्रतिकूल काळ कोणता हे आपल्याला या शास्त्राच्या सहाय्याने कळू शकते. या ब्लॉगवर दिल्या जाणाऱ्या पंचागाच्या व माहितीच्या आधारे आपणास दिवसाचे शुभाशुभत्व आणि दिवसातील चांगला वाईट काळ याचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज येऊ शकतो. तसेच या शास्त्राशी संबंधित समाज गैरसमज , ज्योतिष, अध्यात्म, उपासना व व्यावहारिक तोडगे यावरील लेखमाला व त्या वरील चर्चा आपणास मार्गदर्शक ठरेल अशी मी आशा बाळगतो.


शुभं भवतु .



लेखमाला

प्रेमविवाह आणि पत्रिकामिलन

विवाहाचा निर्णय हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. आई वडिलांची देखील ती एक कठीण परीक्षाच असते. आपल्या मुलाचा अथवा मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ते सर्व निकष लावून स्थळाची पारख करतात. त्यातील एक निकष म्हणजे पत्रिका जुळते आहे कि नाही ते पाहणे. अगदी नास्तिक लोकही पत्रिका जुळवून पाहतात. इतर सर्व व्यावहारिक गोष्टी म्हणजे जात, घर , नोकरी , आर्थिक स्थिती व्यवस्थित असली म्हणजे पालक पत्रिकेकडे वळतात. आणि याचे खरे कारण म्हणजे या सर्व गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रेम मिळवून देत नाहीत कि संसार सुखाचा करू शकत नाही. त्यामुळे मुला मुलीचे एक मेकांशी जमेल का व सुखी संसार होईल का आणि काही वेळेस तर समोरून दिली गेलेली माहिती खरी आहे का हे ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे पत्रिका असे आई वडिलांना वाटते.

सध्याच्या काळात पालकांनी ठरवून दिलेल्या विवाहापेक्षा तथाकथित प्रेम विवाहाचे प्रमाण वाढत आहे आणि पत्रिका जुळवण्यासाठी येणाऱ्या जोड्यांचेपण प्रमाण वाढत आहे. पण खरे पाहता बहुतांश प्रेम विवाहामध्ये खरे प्रेम नसून मुलाने किवा मुलीने स्वतः ठरवलेला विवाह एवढाच मात्र असतो. बरेच लोक असा बचाव करतात कि माझे खरेच प्रेम आहे फक्त आकर्षण नाही. चला एक वेळ एकमेकांविषयी असलेले आकर्षण बाजूस ठेवू पण व्यवहारी निकष लावून निवडलेला जोडीदार प्रेमाच्या व्याख्येत बसेलच कसा ? एखाद्या व्यक्तीविषयी असलेली आपुलकी किवा जिव्हाळा म्हणजेच काही फक्त प्रेम नाही. सहवासातून साकारणारे असेही प्रेम असत नाही.

ज्योतिषामध्ये प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आहे. या शुक्राची एक अंतःस्फूर्ती असते ती आपले प्रेम अगदी बरोबर ओळखते आणि ते देखील कोणतेही निकष न लावता. सौंदर्य , राहणीमान जात, नोकरीधंदा, घर, शिक्षण याकडे पाहून दिलेला होकार शुक्राचा अर्थात प्रेमाचा नक्कीच नाही. खरे प्रेम जडलेली व्यक्ती प्रेम का आहे याचे उत्तर सांगूच शकत नाही . ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. समोरून प्रतिसाद मीळो अथवा न मीळो हे प्रेम अबाधितच राहते. समोरच्या व्यक्तीच्या गुण दोषांचा विचारही प्रेम करत नाही. किंबहुना त्या व्यक्तीस त्याच्या गुण दोषांसहीत प्रेम स्वीकारते. प्रेमाची जाणीव इंद्रियांना , बुद्धीला अथवा मनाला न होता प्रथम आत्म्याला होते. प्रेमात व्यवहार नसतो, मोजमाप नसते. आपल्या जोडीदाराबरोबर जे आयुष्य जसे असेल ते तसे आनंदाने स्वीकारायला लावते ते प्रेम. शुक्राच्या प्रेमाची आंतरिक शक्ती असते निर्बलाना बळ देणारी, हिम्मत , धाडस देणारी. आपल्या जोडीदारास दिलेले भेटीचे निव्वळ वचन कितीही अडथळे आले तरी निभावणारी. मग साक्षात मृत्यूही आला तरी देहात त्रिमिती धारण करून राहणाऱ्या पंचमहाभूताना विलग करून हात जोडून उभे राहावयास सांगणारी.

मग हे प्रेम असे असताना आपली व आपल्या जोडीदाराची पत्रिका पाहण्याचा प्रश्नच का यावा ? यात येणाऱ्या भावी अडचणींविषयी सावध राहण्याचा दृष्टीकोन असेल तर ठीक आहे पण , आमचे जमेल का ? माझा जोडीदार कसा आहे ? तो खरे बोलतोय का ? असे प्रश्न निरर्थक ठरतात.

पत्रिका पाहून गुणमिलन करण्यापेक्षा आपल्या जोडीदारास त्याच्या गुण दोषांसहीत स्वीकारणे आणि पुढील आयुष्य जसे असेल त्यास एकमेकांची सोबत कधीही न सोडता सामोरे जाणे हेच खरे प्रेम आहे. यास्तव जर पत्रिका व गुणमिलनाचा विचार होत असेल तर आपले प्रेम, प्रेमच आहे का? याचा विचार करणे जास्त इष्ट आहे.

शुभं भवतु